रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

संघ प्राणी (स्काऊटसाठी)

 संघ प्राणी (स्काऊटसाठी) 

             स्काऊट शिक्षण हा एक खेळ आहे. हा खेळ खेळण्याची एकमेव पध्दती संघ पध्दती हीच आहे. स्काऊटचे वय हे सुध्दा संघ प्रवृत्तीचे असते. समवयस्क / समस्वभाव असलेली मुले एकत्रीत जमून खेळताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर संघपध्दती या खेळात आलेली आहे. स्काऊटमध्ये ६ ते ८ मुले यांचा एक गट असे कायम स्वरुपी गट करण्यास उत्तेजन दिले जाते या गटाला संघ असे म्हणतात. या संघाना स्काऊट विभागात पशू-पक्षांची नांवे दिली जातात. प्रत्येक संघ त्या नांवाने ओळखला जातो.

            लॉर्ड बेडन पावेल यांनी '' स्काऊट फाॅर बॉईज'' या पुस्तकात कॅम्प फायर कथा ४ मध्ये पेज नंबर ४५ ते ५१ या दरम्यान स्काऊट संघासाठी संघाची नावे व संघ पट्टी साठी कोणता रंग असावा हे सविस्तर दिलेला आहे.

        महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड अभ्यासक्रमातील प्रथम सोपान या पुस्तकात पेज नंबर १० ते १५ या दरम्यान संघाची नावे संघ पट्टी साठी कोणता रंग व त्या संघाची आरोळी दिलेली आहे.










मंगळवार, ९ मे, २०२३

सन्मानसभा Court of Honor (COH)

 सन्मानसभा Court of Honor (COH)

            सन्मानसभा ही युनिटची कार्यकारी सभा असते. युनिटच्या कारभारातील महत्त्वाचे सर्व निर्णय या सभेत घेतले जातात. याकरिता दर महिन्यास अत्यंत नियमित रीतीने ही सभा भरली पाहिजे. युनिटचा पुढील कार्यक्रम ठरविणे हा या सभेच्या कामापैकी एक महत्त्वाचा भाग असल्याने या सभा नियमित होणे जरूर असते. संघनायक हे या सभेचे सभासद असतात. युनिटचे अधिकारी या सभेला उपस्थित राहतात. शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने काही ठिकाणी, काही वेळा सहाय्यक संघनायकांनाही सभेस बोलावले जाते.
            सामान्यतः ही सभा युनिटच्या जागेत होते. पण कधी कधी निरनिराळ्या संघनायकांच्या घरी ही सभा घ्यावी. त्यामुळे अधिकाऱ्यांना पालकांशी प्रत्यक्ष भेटून ओळख करून घेण्याची व कार्यासंबंधी चर्चा करण्याची व पालकांनाही स्काऊट गाईड चळवळीचे कार्य जवळून पाहण्याची संधी मिळते. तसेच अशा सभांच्या वेळी स्वतःच्या वागणुकीने काही आदर्श निर्माण करता येतात. पोषाख व्यवस्थित घालणे; घरात गेल्यावर पादत्राणे नीट लावून ठेवणे; वेळेवर काम सुरू करणे व संपविणे, शांतपणे सौजन्याने वागणे; वडील मंडळींना नमस्कार करणे; कामे संपताच उगाच गप्पा मारीत न बसता शांतपणे घरी निघून जाणे; इत्यादी. अशा गोष्टींची योग्य सवयी व चांगली परंपरा निर्माण करण्याच्या दृष्टीने निश्चित उपयोग होतो.
            संघनायकाची खरोखर काय जबाबदारी आहे, कार्यकारी मंडळाचे काम कसे चालते हा संघटनेतील महत्त्वाचा भाग कळण्याची संधी संघनायकांना येथे मिळते. शिवाय युनिटमधील स्काऊट गाईडना असे समजले पाहिजे की स्काऊट मास्तर अथवा गाईड कॅप्टन हे एकटेच युनिट चालवीत नाहीत. सन्मानसभा युनिटचा कारभार स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाने चालविते. एकाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यामुळे जसा वागणुकीत फरक पडतो, तसाच समूहाच्या नियंत्रणामुळेही दर्जा सुधारतो आणि मोठे अधिकारी ज्याप्रमाणे नियम लावू शकतात, त्याचप्रमाणे समूहही स्वतः हे कार्य करू शकतो, हे नकळत त्यांना येथे समजते. "हे करू नका, असे आम्हाला केव्हाही कोणी सांगितले नव्हते" असे विचार आणि कायदा व नियम मोडण्याची जोरदार प्रवृत्ती, भोवती सर्वत्र आढळत असताना, स्वयंशासनाची वरील कल्पना ही फार बहुमोल अशी शिकवण लहानपणीच संघनायकांना व स्काऊट गाईडना या पद्धतीने मिळते.
                विशेषतः स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन जर स्वतः नेहमी या सभेच्या वादविवादात भाग न घेता, योग्य तो सल्ला देतील, आणि शेवटी "तुम्ही स्वतः आता काय ते ठरवा" असा दृष्टिकोन स्वीकारतील, तर निर्णय कसे घ्यावेत, व कोणत्याही निर्णयाला चांगली व वाईट या दोन बाजू नेहमी कशा असतात, हे संघनायकांना समजेल. तसेच पूर्वी घेतलेल्या निर्णयाचे काही दुष्परिणाम झाले असतील तर ते सभेपुढे स्पष्टपणे मांडण्यास अधिकाऱ्यांनी केव्हाही कचरू नये. आपल्या दोषांची जाणीव होणे हेही फार महत्त्वाचे व अनुभवाने मिळणारे शिक्षण आहे.
               सन्मानसभेचे काम नियमितपणे होणे आवश्यक आहे. नाहीतर सन्मानसभेने जे निर्णय घ्यावयास हवेत, ते स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांनाच घ्यावे लागतील. पण असे होणे फारसे इष्ट नाही. सन्मानसभेत खरोखरीच काही गोष्टी निर्णयात्मक ठरल्या पाहिजेत. संघनायकांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिले पाहिजे व ते बरेचसे योग्य मार्गावरून वाटचाल करीत असतील, तर फारसा सल्लाही देणे अवश्य नाही. ते चूका करतील पण त्यामधूनच ते शिकतील. "मी तुम्हाला सांगितले होते, " या सौम्यपणाने सुचविलेल्या शब्दाचा त्यांच्यावर फार चांगला परिणाम होईल.
            काही वेळेस स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टनना आपले अधिकार गाजवून निर्णय बदलावा लागेल. पण अशावेळी 'असे का केले' हे नीट समजावून सांगणे अवश्य आहे. सन्मानसभेत ठरणाऱ्या गोष्टींवर स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन हे अंतिम निर्णय घेऊ शकतात, हा त्यांचा अधिकार आहे, असे समजले तर, असा अंतिम निर्णय घेण्याचा प्रसंग सहसा येणार नाही. काही वेळेस स्वतःच घेतलेल्या एखाद्या निर्णयाबद्दल स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांनी माहिती सांगावी. पण यावेळेही असे का केले व त्यांना निर्णय घेण्यास का सांगितले नाही हे नीट समजावून सांगावे.
            सन्मानसभेमध्ये झालेले काम गुप्त राखणे अत्यंत आवश्यक आहे. हा लोकशाहीचा फार मोठा व अत्यंत महत्त्वाचा दंडक आहे. या दंडाच भंग झाल्यास ती गोष्ट फार दोषास्पद मानली जावी ! या मुद्यावर चांगला भर द्यावा. केवळ या एका मुद्यामुळेच सन्मानसभेचे महत्त्व एकदम वाढेल. सन्मानसभेचे सभासद होताना अशा गुप्ततेचे महत्त्व समजावून सांगून, गुप्ततेचा आदेश सभासदांना घेण्यास सांगणे इष्ट ठरेल व त्यांचा परिणामही चांगला होईल.
            स्काऊट मास्तर/गाईड कॅप्टन यांनी सन्मानसभेचे अध्यक्ष होऊ नये. संघनायकापैकी एकाची आलटून पालटून योग्य तऱ्हेने निवड करून, त्यास अध्यक्ष करीत आहेत, इकडे लक्ष द्यावे. स्काऊट मास्तर/गाईड कॅप्टन यांनी अध्यक्षाच्या जवळ बसावे आणि योग्य तेथे हळूहळू सल्ला देऊन सभेच्या कामात कोणत्याही तऱ्हेचा व्यत्यय न आणता अध्यक्षाला मदत करावी. यामुळे त्यांच्याशी बोलावयाचे असल्यास इतर संघनायकांना अध्यक्षांच्या दिशेनेच त्यांच्याकडे पहावे लागेल.
         सभेच्या नेहमीच्या तंत्राप्रमाणे याही सभेचे काम होत असते. विशेषतः मागील सभेचा वृत्तांत वाचणे, अध्यक्षांची व चिटणीसांची नेमणूक करणे, नेहमी अध्यक्षांना उद्देशून बोलणे व पद्धतशीर रीतीने सभेचे काम पार पाडणे याकडे विशेष लक्ष द्यावे. पुढे कित्येक वर्षानंतर त्यांना एखाद्या विधान सभेचे काम प्रत्यक्ष बघण्याची अथवा त्यात नागरिक प्रतिनिधी म्हणून भाग घेण्याची संधी मिळेल. त्या वेळी या गोष्टींचे महत्त्व त्यांच्या ध्यानात येईल.
           सन्मानसभेच्या इतर कोणत्याही फायद्यांपेक्षा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे, यामुळे संघपद्धतीला प्रोत्साहन मिळते व संघभावनेची जोपासना होते. संघाकरता संघनायक जबाबदार आहे, असे प्रत्येक संघनायकाला सांगितले जाते. पण या जबाबदारीची जाणीव त्याला सन्मानसभेइतकी इतरत्र कोठेच होत नाही. संघनायक हे त्यांच्या संघाचे प्रतिनिधी आहेत. म्हणून संघातील इतर सभासदांची मते विचारून घेऊन, त्यांना स्वतःला पटत नसली तरीही सभेत ती मांडणे, हे त्यांचे काम आहे. या गोष्टींची त्यांना वारंवार जाणीव करून द्यावी. आपल्या संघाची मते, विचार, कल्पना व सूचना, सन्मानसभेत ते मांडीत आहेत, याची खात्री करण्याकरता त्यांना मेळाव्यामध्ये संघाकरिता वेळ द्यावा किंवा संघमेळाव्यात ते काय करतात याकडे लक्ष द्यावे. याकरता संघामध्ये कोणत्या गोष्टींवर विचार करावयाचा, याबद्दल संघनायकांना आगाऊ काही मुद्दे कळणे जरूर आहे. एकदा बहुमताने घेतला गेलेला निर्णय जणू काही एकमतानेच घेतला गेला आहे, अशा वृत्तीने तो निर्णय सर्वांनी मान्य करण्याचे व त्याप्रमाणे वागण्याचे अत्यंत कठीण असे लोकशाहीचे प्रत्यक्ष शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा.
            संघातील प्रत्येक सभासदाबद्दल, विशेषतः त्यांच्या प्रगतीबद्दल संघनायकाने सन्मानसभेत वृत्तांत दिला पाहिजे. असे करण्याने संघनायकांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून देण्यास चांगली संधी प्राप्त होते. नंतर कोणत्याही संघनायकाला अथवा अधिकाऱ्याला, त्यांच्या संघाच्या कामाविषयी व संघाच्या सभासदांविषयी त्याला प्रश्न विचारण्याची मुभा असावी, संघनायकाला अशा प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत. आपल्यावरच्या जबाबदारीचे पालन करण्याचे हे शिक्षण आहे.
            युनिटच्या मानाचे संरक्षण करणे, मान कायम राखणे, या दृष्टीने सन्मानसभा जेव्हा एखाद्या शिस्तीच्या प्रश्नाचा विचार करते. त्यावेळी जरूर ते गांभीर्य राखणे महत्त्वाचे आहे. पुढे दिलेली पद्धती बहुतेक सर्वत्र उत्तम ठरेल. ज्याच्या हातून शिस्तभंग झाला अशा स्काऊट / गाईडच्या समोर, सभेच्या अध्यक्षांनी अथवा स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांनी, अथवा ज्याने त्या स्काऊट गाईडला सन्मानसभेपुढे आणले असेल त्याने, कोणत्या तऱ्हेची चूक झाली आहे हे सांगावे. नंतर त्याला/ तिला स्वतःची बाजू मांडण्यास संधी द्यावी. जरूर तर त्याकरिता साक्षीदारही आणण्यास हरकत नसावी. नंतर त्या स्काऊट गाईडला बाहेर जाण्यास सांगावे; आणि त्या प्रश्नाबद्दल सभेमध्ये चर्चा करावी. शेवटी त्याला/तिला पुन्हा बोलावून घेऊन सन्मानसभेचा निर्णय सांगण्यापूर्वी व नंतरही आपले मत मांडण्यास संधी द्यावी. अशा व्यक्तीने सन्मानसभेपुढे येण्याचेच नाकारले, तर ती व्यक्ती एखादे वेळेस युनिट सोडून जाण्याचा धोका टाळण्यासाठी शिस्तभंग झाला असताना तातडीची सन्मानसभा मेळावा संपल्यावर लगेच बोलवावी. निसर्गनिवासाच्या वेळी याचा चांगला परिणाम होतो. चूक झाली असता, त्याचा परिणाम चूक करणाऱ्यावर किती झटपट होऊ शकतो, हे यामुळे सर्वांना कळते, व त्यामुळे एकंदर शिस्तीवर त्याचा फार चांगला परिणाम होतो. लहान मुले चुका करणारच. त्याचा परिणाम म्हणून मुलगा/मुलगी युनिट सोडून जाणार नाही याकडे लक्ष ठेवले पाहिजे. शिक्षणाकडे दृष्टी असावी. शिक्षेकडे नव्हे. वागणुकीत सुधारणा व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावेत. आपल्या कार्यपद्धतीला हे एक आव्हान आहे अशा विचाराने सुधारणा करण्याचे मार्ग शोधून काढावे. स्काऊट मास्तर/गाईड कॅप्टन यांनी अशा बाबतीत अधिक जाणतेपणाने लक्ष घालावे. कोणाला 'जा, म्हणून सांगणे सोपे आहे. तो अगदी शेवटचाच निराशेचा मार्ग आहे. तो टाळणे आवश्यक आहे. स्काऊट मास्तर/गाईड कॅप्टन यांनी याकडे लक्ष विशेष द्यावे. भावनेच्या आहारी न जाता योग्य व उपयुक्त निर्णय कसा घ्यावयाचा, याचे शिक्षण अशा शिस्त प्रसंगाच्या सभांमधून संघनायकांना मिळते.
            प्रत्येक मेळावा संपल्यानंतर थोडा वेळ सन्मानसभा बोलवावी. त्या वेळी, झालेल्या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे गुणदोष, उपस्थिती व पुढील मेळाव्यासंबंधी सूचना याबद्दल जरूर तो विचार करावा. या सभेचे काम ५ ते १० मिनिटात संपवावे. यामुळे संघनायकांशी चांगला संबंध राहतो व पुढील मेळाव्याबद्दल काही सूचना असल्यास त्याही सर्वांना ताबडतोब कळू शकतात.
                अशा रीतीने त्याग, निष्ठा, जबाबदारीची जाणीव व जबाबदारी अंगावर घेऊन काम करण्याची सवय, सभेच्या तंत्राचे ज्ञान व कृती आणि लोकशाही पद्धतीच्या कामाचे प्रत्यक्ष शिक्षण इ. अनेक उपयुक्त गोष्टी व कृती सन्मानसभेमधून संघनायक शिकू शकतात. असे अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे शिक्षण मिळत असतानाही काही स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन सम्मानसमे शिवायच युनिटचे काम करतात. ही केवळ आश्चर्याची गोष्ट आहे, एवढेच नव्हे तर स्काऊट गाईड युनिट कशी चालवू नये याचे ते प्रत्यक्ष आचरण करीत असतात; हे अधिक आश्चर्य नव्हे काय !!
१) सन्मानसभा हा संघपद्धतीचा एक फार महत्त्वाचा व आवश्यक असा भाग आहे.
२) युनिटच्या कार्याची अंतिम जबाबदारी व अधिकार जरी स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांचा असला, तरी युनिट चालविण्याचे प्रत्यक्ष कार्य सन्मानसभेमार्फतच झाले पाहिजे.
३) आजच्या काळात महत्त्वाचे असे लोकशाहीचे व नेतृत्वाचे प्रत्यक्ष अनुभवाने मिळणारे शिक्षण अन्यत्र कोठेही उपलब्ध नाही. स्काऊट गाईड चळवळीत याला मानाचे स्थान आहे. या दृष्टीने याचा उपयोग स्काऊट/गाईड शिक्षणात केला पाहिजे.

संघ, संघध्वज, संघ आरोळी, संघगीत, संघ कोपरा

 संघ, संघध्वज, संघ आरोळी, संघगीत, संघ कोपरा

संघ :-

        स्काऊट-गाईड शिक्षण हा एक खेळ आहे. हा खेळ खेळण्याची एकमेव पध्दती संघ पध्दती हीच आहे. स्काऊट-गाईडचे वय हे सुध्दा संघ प्रवृत्तीचे असते. समवयस्क / समस्वभाव असलेली मुले-मुली एकत्रीत जमून खेळताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर संघपध्दती या खेळात आलेली आहे. स्काऊट-गाईडमध्ये ६ ते ८ मुले/मुली यांचा एक गट असे कायम स्वरुपी गट करण्यास उत्तेजन दिले जाते या गटाला संघ असे म्हणतात. या संघाना स्काऊट विभागात पशू-पक्षांची व गाईड विभागात फुले अथवा नक्षत्राची नांवे दिली जातात. प्रत्येक संघ त्या नांवाने ओळखला जातो.

           प्रत्येक संघाचा एक नेता असतो त्यास संघनायक / संघनायीका म्हणतात. त्यांना सहाय्यक म्हणून एक सहाय्यक संघनायक / सहाय्यक संघनायीका असते. नेतृत्वाचे ज्ञान प्रत्येक संघनायक / संघनायकेस मिळत असते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ काम करतो. मी व माझा संघ अशी आपुलकीची भावना निर्माण होते. संघनायक/संघनायीका ही चतुर, हुशार असल्यास त्या संघाचा दर्जा ही चांगला राहतो. प्रत्येक संघनायक आपल्या संघाच्या कार्यक्षमतेबद्दल व तत्परतेबद्दल जबाबदार असतात. गाईड कंपनी व गाईड कॅप्टन तसेच स्काऊट टूप व स्काऊट मास्तर यांच्या मधील संघनायक हा एक दुवा असतो.

            खऱ्याखुऱ्या नेतृत्वाचा व जबाबदारीचा संघनायक व संघनायीका यांना आपल्या संघासाठी आपुलकी आणि अत्मियतीने स्पर्धात्मक दृष्टीने कार्य करताना अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येक सभासदाला आपला संघ, संघाचे हित, संघाचे वैशिष्ट्य उत्तम राखण्याची जबाबदारी माझी ही आहे याची जाणीव होते. आपल्या संघाचा दर्जा टिकविणे व संघातील दिर्घ बुद्धीची व्यक्ती मंद बुद्धीच्या व्यक्तिचा परीश्रमाने तयारी करून सर्वांच्या बरोबर आणते. संघ म्हणजे एक कुटुंबच अशी आत्मियतेची भावना एकमेकांना समजून घेवून एकत्र कार्य केल्याने निर्माण होते. स्काऊट गाईड या खेळातील महत्वाचा दुवा संघनायक / संघनायीका हा आहे. संघाची पूर्ण जबाबदारी अंगावर घेवून कसे काम करावे यांचे मार्गदर्शन स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन करीत असतात.

        शिक्षणातील कौशल्ये प्रथम संघनायक / संघनायीका यांना शिकविली जातात. व ते संघाला शिकवितात. "दिल्याने वाढतेरे ऐसे एकची धन तेचि विद्याधन" या उक्तीनुसार हे कार्य चालते.


संघ सभा :-
        संघातील सर्व सभासद एकत्र येऊन कांही विचार विनिमय करतात, संघाचा कार्यक्रम ठरवितात. सन्मान सभेकडे पाठविण्याच्या सूचनांचा विचारविनिमय करतात. या सभेस संघातील सर्व सभासद उपस्थित असतात. या सभेला संघसभा म्हणतात. ही सभा आठवड्यातून एकदा होते.

संघ ध्वज :-
        

            प्रत्येक संघाला त्यांचा स्वतः चा ध्वज असतो. त्याचा रंग पांढरा असतो. हा ध्वज त्रिकोणी असून त्या त्रिकोणाचा पाया २० सें. मी. व दोन्ही बाजू ३० सें. मी. असते. त्यावर त्यांच्या संघाचे लाल रंगाचे चित्र असते.

संघ आरोळी :-
            ध्वजारोहणानंतर स्काऊट-गाईडना स्फुर्ती येण्यासाठी व आनंद व्यक्त करण्यासाठी आरोळी दिली जाते. प्रत्येक संघातून त्या त्या संघाचे नांव घेऊन ही आरोळी दिली जाते. ही आरोळी देणारी व्यक्ति चपळ असावी. तीच्या आरोळी देण्याच्या पध्दतीने इतरांनाही उत्साह निर्माण होतो.
उदा : गुलाब संघ
१ गुलाब है फुलोंका राजा सुगंध सुहाना ताजा ताजा अथवा :-
२ कमळ कमळ सदा निर्मळ

संघ गीत :-
प्रत्येक संघाचे वैशिष्ठ दर्शविणारे एक गीत असते. त्याला संघ गीत म्हणतात.
उदा : गुलाब संघ
हम सब गुलाब की कलियाँ है,
हम सब खुशियोंकी डालियाँ है ।
भोले बचपन की सखियाँ है,
हम सब गुलाबकी कलियाँ है ॥


संघ कोपरा :-

        संघात कौशल्यांचा सराव करण्यासाठी अथवा संघ स्पर्धेच्या वेळी प्रत्येक संघ आपल्या निश्चित केलेल्या जागी कार्यक्रमाचा सराव करतो, त्या ठिकाणास संघ कोपरा असे म्हणतात. संघ कोपऱ्यामध्ये सर्व संघ सदस्य एकत्र बसून संघनायक /संघनायकेच्या मार्गदर्शनाखाली संघ कार्याच्या पद्धतीचा आढावा घेतात या संघ कोपऱ्यात बसून संघाची वैशिष्ठ्ये संपादन करण्याची ऐक्यांची सहकार्याची भावना निर्माण होते. संघ म्हणजे एक कुटुंब इतकी जवळीक निर्माण करणारा आपपर भाव विसरविण्यास लावणारा हा कोपरा म्हणजे संघ कोपरा होय.